औरंगाबाद- दोन भामटयानी वृद्ध महिलेच्या गळ्यातील तीन ग्रॅम सोने लुटल्याचा प्रकार आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास जालनारोडवरील सेव्हनहिल उड्डाणपुलाखाली घडला. दिवसाढवळ्या वर्दळीच्या ठिकाणी लुटीचा प्रकार घडल्याने सर्वसंन्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.अनुसयाबाई शिंदे, वय ५८ ( रा.सिंदोन-भिंदोन) असे महिलेचे नाव आहे.
शिंदे या औरंगाबाद मधील पिसादेवी भागात राहणाऱ्या नातेवाईकडे आल्या होत्या. त्यांना पिसादेवीकडे जाणाऱ्या रिक्षाची माहिती नसल्याने त्या उड्डाणपुलाखाली थांबल्या होत्या. दरम्यान, दोन अनोळखी तरुण त्यांच्या जवळ आले व रस्त्याच्या पलीकडे पिसादेवीकडे जाणारी रिक्षा थांबते तुम्हा रस्ता ओलांडून देतो अशी थाप मारली व उड्डाणपुलाखाली येताच दोघांनी महिलेच्या गळ्यातील तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. महिलेने आरडाओरड करेपर्यंत दोघेही पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच गुन्हेशाखेचे निरीक्षक मधुकर सावंत आणि जिन्सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक केंद्रे यांनी पथकासह घटनस्थळी धाव घेतली. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही च्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुपार पर्यंत महिलेच्या तक्रारीवरून जिन्सी पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.